शरद पवार हे देशाला न लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान
आहेत. ज्यांच्याकडे विकासाची दृष्टी आणि जागतिक भान आहे, त्यांना ही गोष्ट नक्कीच
जाणवेल, असे उद्योगपती राहुल बजाज यांनी सांगितले. ते शनिवारी बारामती येथील कृषी
विज्ञान महाविद्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाला राहुल
बजाज यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित
होते. यावेळी अरूण जेटलींनीही बारामतीचा विकास केल्याबद्दल पवारांची स्तुती केली. तत्पूर्वी
काल बारामतीत आगमन झाल्यानंतर जेटलींनी पवारांच्या गोविंदबाग या निवासस्थानी पाहुणचार
घेतला. आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील बारामतीला भेट दिली होती.
केंद्रात आणि राज्यात राष्ट्रवादी विरोधी पक्षात असूनही पवार आणि भाजपमधील अनोखे सख्य
जेटलींच्या भेटीने पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले आहे. गेल्या काही दिवसांत राज्याच्या
सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाढत्या कुरबुरी पाहता अरूण जेटलींच्या
बारामती भेटीकडे राजकीय वर्तुळातील अनेकांचे लक्ष लागले आहे.
