पानशेतच्या पुराचं पाणी वाढतच होतं; पण आम्ही काहीही करू शकत नसल्याचं दुःख वाटत होतं. रघुनाथ खाणीवाले सरांचा संसार डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होत होता. मला तर काय बोलावं, हेच सुचत नव्हतं; पण त्या परिस्थितीतही सर आमच्याशी बोलले होते ः ‘‘अरे पोरांनो, संसार अन् घर काय, मी ते पुन्हा उभं करीन; पण ते सुवर्णपदक, ब्लॅकबेल्ट हा अमूल्य ठेवा मी कसा परत मिळवू?’’
महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या बीएमसी कॉलेजात (बीएमसीसी) झालं. बारामतीसारख्या छोट्या गावातून विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहरात मी दाखल झालो होतो. त्या काळी छोट्या छोट्या गावांतून आलेल्या माझ्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी एकदम नवं वातावरण होतं. पुणेरी भाषा, पुण्यातल्या मुलांची वागण्या-बोलण्याची पद्धत या सगळ्याशी जुळवून घेताना अनेक गमतीही घडायच्या. महाविद्यालयात असतानासुद्धा वर्गात मिळणाऱ्या शिक्षणापेक्षाही आमचा अधिक वेळ महाविद्यालयाच्या आवारातच सतत होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये जायचा. त्यामुळं खेळांच्या अनेक प्रकारांत व सांस्कृतिक कार्यक्रमांत उत्साहानं सहभाग असायचा. आम्हाला शिकवणारी सगळी प्राध्यापकमंडळीसुद्धा आमच्याशी अतिशय मैत्रीच्या नात्यानं वागत असत.
कॉलेजच्या अभ्यासक्रमात एक पीरिअड पीटीचा सक्तीचा असे. कॉलेजच्या क्रीडा विभागाचे प्रमुख म्हणून रघुनाथ खाणीवाले सर यांच्याशी आमच्या ग्रुपची विशेष सलगी असायची. खाणीवाले सरांची प्रकृती दणदणीत होती. सर आम्हाला नेहमी मे महिन्याच्या आणि दिवाळीच्या सुटीत पुण्यात शाहू तलावावर पोहायला न्यायचे. पोहण्याचा व्यायाम सगळ्यात उत्तम असतो आणि आम्ही तो केलाच पाहिजे, यासाठी त्यांची खटपट असायची. शिवाय भरपूर पोहणं झाल्यावर सर आम्हाला स्वतःच्या पैशानं नाश्ताही द्यायचे. खरंतर त्यांचं मुख्य काम पीटी घेण्याचं असे; पण त्यासोबत त्यांना धनुर्विद्या आणि ज्यूडो या खेळांतही गती होती. त्यांच्या तरुणपणात ऑलिंपिकमध्ये धनुर्विद्या हा फक्त प्रदर्शनीय खेळ होता. बर्लिन ऑलिंपिकमध्ये खाणीवाले सरांनी धनुर्विद्येत देशाला पहिलं पदक मिळवून दिलं होतं. पुढं त्यांनी ज्यूडोमध्येही ब्लॅकबेल्ट मिळवला होता. सर त्या वेळी पुण्यात नारायण पेठेत राहायचे. सन १९६१ मध्ये पानशेत धरण फुटलं, ही बातमी आली, तेव्हा आम्ही सर्व जण कॉलेजच्या मैदानावर होतो. पुराचं पाणी शहरात घुसलं होतं आणि सगळीकडं हाहाकार माजला होता.

बीएमसीसीमध्ये शिकत असताना क्रीडाशिक्षक रघुनाथ खाणीवाले सर (मधल्या रांगेत डावीकडून तिसरे) यांच्यासमवेत शरद पवार (मधल्या रांगेत डावीकडून दुसरे) अन्य मित्रांसह. सन १९५८ मधलं छायाचित्र.
आम्ही सर्व विद्यार्थी डेक्कन पुलावरून नदीच्या दुसऱ्या बाजूला आलो आणि नारायण पेठेतल्या सरांच्या घरासमोर गेलो. सर आणि त्यांच्या पत्नीला पोलिसांनी घराच्या बाहेर सुखरूपपणे काढलं होतं. आम्हीसुद्धा जवळ उभे होतो. पुराचं पाणी वाढतच होतं; पण आम्ही काहीही करू शकत नसल्याचं दुःख वाटत होते. डोळ्यांदेखत सरांचा संसार उद्ध्वस्त होत होता. मला तर काय बोलावं, हेच सुचत नव्हतं; पण त्या परिस्थितीतही सर आमच्याशी बोलले होते ः ‘‘अरे पोरांनो, संसार अन् घर काय, मी ते पुन्हा उभं करीन; पण ते सुवर्णपदक, ब्लॅकबेल्ट हा अमूल्य ठेवा मी कसा परत मिळवू?’’ एरवी खेळाच्या मैदानावर केवळ आपल्या दणदणीत प्रकृतीच्या आणि शिस्तशीर स्वभावाच्या जोरावर मुलांची टोळकी काबूत ठेवणाऱ्या सरांच्या त्या हळव्या स्वभावाची झलक आम्हाला हलवून गेली. त्यांचा अमूल्य ठेवा आम्ही वाचवू शकलो नाही, ही खंत मात्र कायमची राहिली.
यथावकाश डिग्री मिळाल्यावर आमचा कॉलेजचा संबंध संपला. माझ्या ग्रुपमधले तसे आम्ही सर्व जण एकमेकांच्या संपर्कात होतो. काही जण नोकरी-व्यवसायाच्या निमित्तानं बाहेर होतो. मीही राजकारणात पुढचे टप्पे गाठत मुंबईमध्येच अधिक राहू लागलो होतो. लष्करात भरती झालेला माझा मित्र कर्नल संभाजी पाटील एकदा सुटीत पुण्याला आला होता. त्याला आमचे खाणीवाले सर भेटले. सरांची स्थिती बिकट होती. माझ्याकडं कर्नल संभाजी पाटील, विठ्ठल मणियार, सायरस पूनावाला असे सगळे मित्र आले. त्यांनी खाणीवाले सरांची परिस्थिती मला सांगितली. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सर्व जण लोकमान्यनगर इथं सरांच्या घरी गेलो. सरांच्या पत्नीला आम्ही काकू म्हणायचो. त्यांनी सतरंजी अंथरली. आम्हाला चुरमुरे आणि लाडू आणून दिले. आम्ही कुणी फार मोठे झालो आहोत, याची जाणीवच त्या माउलीला नव्हती. अगदी पूर्वीच्याच जिव्हाळ्यानं त्या आमच्याशी वागत होत्या. त्यामुळं त्या दोघांसाठी आम्ही विद्यार्थीच होतो. त्यांच्या घरातून निघालो, तरी देशाला पहिलं ऑलिंपिक पदक देणाऱ्या खाणीवाले सरांसाठी आपण काहीतरी करायला हवं, हा विचार मला स्वस्थ बसू देत नव्हता. परत सगळ्या दोस्तांना एकत्र केलं आणि आपल्या सरांसाठी निधी गोळा करायचा आणि तो बॅंकेत ठेवायचा म्हणजे त्याच्या व्याजातून त्यांना दरमहा काही पैसे मिळतील अशी व्यवस्था करायची, असं ठरवलं. सगळ्या मित्रांनी मिळून चांगला निधी जमा केला आणि आमच्या सरांना हा कृतज्ञता निधी देण्याचा कौटुंबिक कार्यक्रम आपल्या कॉलेजमध्येच करावा, असंही ठरलं. मी स्वतः ही गुरुदक्षिणा त्यांच्या हाती द्यायची, हेही नक्की केलं.
एव्हाना मी राज्याचा मुख्यमंत्री झालो होतो; त्यामुळं ठरवलेले कार्यक्रम वेळोवेळी पुढं-मागं होत होते. सरांचा कार्यक्रम ठरला त्या दिवशी नेमकी वीजतुटवड्याची एक महत्त्वाची बैठक मंत्रालयात घ्यावी लागली होती. पुण्याला जायला जमेल की नाही, अशी शंका मला सतावत होती; परंतु शेवटी कुठल्याही परिस्थितीत या कार्यक्रमाला पोचायचंच, असं ठरवून मी पुण्याच्या एअरपोर्टला आलो, तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते. माझे मित्र धनाजी जाधव, सायरस पूनावाला हे विमानतळावर माझी वाटच पाहत होते. आम्ही महाविद्यालयात पोचल्यावर रात्री बारा वाजेपर्यंत हा कार्यक्रम रंगला. सरांना निधी अर्पण केल्यानंतर ते बोलायला उठले; पण त्यांच्या तोंडून शब्दही फुटला नाही, इतके ते भारावून गेले होते. त्यांच्या डोळ्यांतून ओघळलेले आनंदाश्रू हेच त्यांनी सत्काराला दिलेलं उत्तर होतं. पुढच्या आयुष्यात मी क्रीडा क्षेत्रात रस घेऊ लागलो आणि क्रीडापटूंची व त्यांच्या शिक्षकांची उतरत्या काळात परवड होऊ नये, ही जबाबदारी नेटकेपणानं सांभाळली पाहिजे, असा दंडकच मी त्या वेळी स्वतःला घालून घेतला.
---------------------------------------------------------
क्रीडापटूंची व त्यांच्या शिक्षकांची उतरत्या काळात परवड होऊ द्यायची नाही. यासंदर्भातली जबाबदारी नेटकेपणानं सांभाळायची, असा दंडकच मी स्वतःला घालून घेतला.