राष्ट्रपती, पंतप्रधान यांचे गौरवोद्‌गार
नवी दिल्ली - भारतीय राजकारणातील भिन्न विचारसरणीचे विविध राजकीय पक्ष एका व्यासपीठावर येणे, हा वैशिष्ट्यपूर्ण राजकीय व्यक्तिमत्त्वाचा प्रमुख पैलू असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या कर्तृत्वाला सलाम, असे भावपूर्ण उद्‌गार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे काढले. 
पवार यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस १२ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (गुरूवारी) येथील विज्ञानभवनात झालेल्या सोहळ्यात भारतीय राजकारणातील जवळपास सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे नेते, केंद्रीय मंत्री, चार राज्यांचे मुख्यमंत्री आणि पवार यांचे राज्यातील व देशातील असंख्य चाहते सहभागी झाले होते.

सायंकाळी साडेपाच ते सात या दीड तास चाललेल्या सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग हे व्यासपीठावर उपस्थित होते, तर प्रेक्षकांत उद्योगजगतातील प्रमुख उद्योगपती, क्रिकेट क्षेत्रातील रवी शास्त्री, बिशनसिंग बेदी यांच्यासारखे नामवंत, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचा समावेश होता. सर्व पक्षांचे खासदार तसेच शरद पवार यांचे संपूर्ण कुटुंबिय समारंभाला उपस्थित होते आणि गर्दीमुळे अनेकांवर उभेदेखील राहण्याची वेळ आली. 

आजच्या समारंभात पवार यांच्या आठवणींवर आधारित ‘लोक माझे सांगाती’ हे मराठीतील, तर ‘ऑन माय टर्म्स’ हे इंग्रजीतील आत्मकथनपर ग्रंथ प्रकाशित झाले. त्यांच्यावर विविध मान्यवरांनी लिहिलेल्या लेखांचा समावेश असलेल्या गौरवग्रथांचे प्रकाशनही पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात आले. पवार यांना शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रतिभा पवार यांचाही या निमित्ताने सत्कार करण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे यांनी आभार मानले.

अत्यंत आटोपशीर अशा या समारंभात पवार यांनी प्रथम आपले मनोगत व्यक्त करताना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित समारंभाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व मान्यवरांबद्दल कृतज्ञता प्रकट केली. आपल्या राजकीय प्रवासाचा आढावा घेताना त्यांनी त्यांच्यावर झालेल्या त्यांच्या माता-पित्यांच्या संस्कारांचा, तसेच महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्यांचे लाभलेले मार्गदर्शन, तसेच दीर्घकाळ राजकारणात दिलेल्या पाठिंब्याबद्दल लोकांबद्दल कृतज्ञता प्रकट केली. 

आपल्या भाषणात पवार यांनी प्रामुख्याने दोन विचार मांडले. लोकप्रतिनिधींना लोक काही अपेक्षेने निवडून देत असतात. लोकप्रतिनिधींनी लोकांचे प्रश्‍न उपस्थित करावेत, त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न केले जावेत, अशी लोकांची अपेक्षा असते. त्यामुळे संसद किंवा विधिमंडळे यांचे कामकाज सुरळीत चालणे हे आवश्‍यक असते. गोंधळ घालून कामकाज रोखणे, हा त्यावर उपाय नसतो, असे त्यांनी म्हटले आणि अप्रत्यक्षपणे सध्या संसदेत निर्माण झालेल्या गोंधळ व कोंडीबाबतची नाराजी व्यक्त केली; परंतु १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशाचे बहुविध व विविधतापूर्ण स्वरूप लक्षात घेता, हा देश लोकशाही पद्धतीने, धर्मनिरपेक्ष तत्त्वे आणि सहिष्णुतेच्या व उदार तत्त्वांच्या आधारेच चालला पाहिजे आणि देशाचे हे स्वरूप टिकविले तरच देश प्रगतीपथावर राहील, असे विचार व्यक्त करून देशात सध्या घडत असलेल्या असहिष्णुतेच्या घटनांवरही त्यांनी कटाक्ष केला. राजकारण हे विकासावर आधारित असले पाहिजे आणि जनतेत सलोखा, एकता कायम राहिली पाहिजे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. 

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या भाषणात पवार यांच्या प्रशासकीय कार्यक्षमतेचा विशेष उल्लेख केला. मुंबई स्फोटांनंतर मुंबईला तत्काळ पूर्वपदावर  आणण्याचे आव्हान त्यांनी कसे प्रभावीपणे पार पाडले, याचा संदर्भ देताना त्यांनी त्या वेळी आलेल्या एका वृत्तपत्रीय मथळ्याने, ‘सलाम बाँबे, सलाम पवार’ने आपल्या भाषणाचा समारोप करताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. 

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी पवार यांच्या संसदेतील कामगिरीबाबत बोलताना कितीही चलाखीने विचारलेल्या प्रश्‍नांवर पवार अत्यंत चपखल उत्तरे देऊन संबंधित सदस्यांचे समाधान करीत, अशी आठवण सांगितली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार यांचा गौरव करताना रचनात्मक काम हा त्यांच्या राजकारणाचा पाया असल्याचे सांगितले. त्याचबरोबर सर्व पक्षांशी असलेले त्यांचे मित्रत्वाचे संबंध हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष असल्याचेही म्हटले. शेती आणि शेतकरी यांच्याशी पवार हे मनःपूर्वक जोडलेले आहेत, असे सांगतानाच पंतप्रधानांनी, शेतकऱ्याला हवामानाची फार चांगली जाण असते आणि पवारांमध्ये शेतकऱ्याचा हा गुण पुरेपूर आहे व राजकारणात त्यांनी त्याचा भरपूर उपयोग केल्याचे सांगताच सभागृहात एकच हंशा पिकला. 

सोनिया गांधी यांनी पवार यांच्या सर्व पक्षांमध्ये असलेल्या उत्तम संबंधांचा उल्लेख करताना पवार यांच्या ‘फॉर्मिडेबल नेटवर्किंग’चा हा पुरावाच आहे की आज येथे भारतीय राजकारणातील जवळपास सर्व पक्षांचे नेते उपस्थित आहेत असे म्हटले. पवार यांच्याबरोबर काही मुद्‌द्‌यांवर मतभेद झाले तरी परस्परांबद्दलच्या आदरभावात कोठेही कमी झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले. यूपीए सरकारमध्ये कृषिमंत्री म्हणून त्यांनी केलेली कामगिरी, अन्नधान्याच्या क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण करण्याचा केलेला विक्रम याचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. 

शरद पवार म्हणाले...
- जनतेची अपेक्षा आहे की संसदेचे कामकाज चालावे. तेथे जनतेच्या समस्या मांडल्या जाव्यात. विरोधकांनीही आपल्या अधिकारांचा वापर करून सरकारच्या कामकाजातील त्रुटी समोर आणाव्यात’ आणि ‘बहुलतावादी, सहिष्णू, उदारता यातूनच आपल्याला पुढे जाता येईल. विकास सर्वांना जोडणारा असावा.
- बहुभाषी, बहुधर्मी असलेला देश सर्वांत मोठी लोकशाही आहे. सारे जग आपल्याकडे भविष्यातील महाशक्ती म्हणून पाहतो. बहुलवादी, धर्मनिरपेक्ष, सहिष्णू आणि उदार चरित्र कायम ठेवूनच विकासात पुढे जाऊ. आर्थिक आणि सामाजिक विकासातूनच गरिबी दूर केली जाऊ शकते. विकास हाच एकमेव पर्याय आहे, जो धर्म, प्रांत, भाषा या पलीकडे जाऊन सर्वांना समृद्धी देऊ शकतो. 
- १९६७ मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात आमदार झाल्यापासून ते आजपर्यंत, प्रत्येक वेळी देशासाठी काम करण्याची संधी दिल्याबद्दल विधानसभा आणि संसदेत पाठविणाऱ्या बारामती, माढा या मतदार संघांतील मतदारांचा मी आभारी आहे. 
- यशवंतराव चव्हाण माझ्यासाठी ‘श्रद्धेय’ आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली राजकीय कारकीर्द घडली. १८ व्या वर्षी काँग्रेसशी जोडलो गेलो आणि युवक काँग्रेसचे काम सुरू केले. स्वातंत्र्य सेनानी असलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी पक्ष संघटनेची आणि नंतर प्रशासनाचीही जबाबदारी सोपविली. 
- कृषी शास्त्रज्ञांचे योगदान आणि शेतकऱ्यांचे परिश्रम यामुळे आज देशाने भुकेच्या समस्येवर मात केलीच; शिवाय तांदूळ, गहू, साखर, कापसाचा सर्वांत मोठा निर्यातदारही बनला.

कोण काय म्हणाले
प्रणव मुखर्जी
- राजकीय मान्यवरांना एकत्र आणून भारतीय लोकशाहीची अंगभूत क्षमता दर्शविल्याबद्दल शरद पवार यांचे आभार 
- कृषिमंत्रिपद भूषविलेल्या पवारांमुळे भारत गहू, तांदळाचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक देश
- मुंबईत भीषण साखळी बाँबस्फोट झाले होते. या वेळी धीरोदात्तपणे शरद पवार यांनी आर्थिक राजधानी मुंबईची गाडी रुळावर आणली. सलाम बाँबे... सलाम शरद पवारजी.

नरेंद्र मोदी
- पाच दशकांपासून शरद पवार यांचे जीवन अखंड एकनिष्ठ साधनेसारखे आहे.
- राजकीय जीवन आणि सहकारातील जीवन याचे उत्तम संतुलन पवार यांनी साधले
- आर्थिक राजधानी मुंबईला अंडरवर्ल्डच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी खंबीरपणे पवार यांनी निर्णय घेतले
- गुजरातमध्ये कापसाऐवजी गव्हाला प्राधान्य देण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन केले.
- क्रिकेटबद्दलही बोलताना त्यांच्या मनात शेतीचा, नव्या तंत्रज्ञानाचाच विचार 

सोनिया गांधी
- शरद पवार हे ‘बेस्ट पॉलिटिशियन’; त्यांनी सेंच्युरी पूर्ण करावी
-राजकारणापलीकडे जाऊन विरोधकांशीही मैत्री करण्याचे त्यांचे कौशल्य
-शरद पवार यांच्या ‘गुगली’ टाकण्याच्या राजकीय खेळ्यांवर त्यांच्या ‘लेग स्पिनर’ क्रिकेटपटू सासऱ्यांचा प्रभाव
-प्रतिभाताई पवार या शरद पवार यांच्या कारकिर्दीचा आधारस्तंभ
-शरद पवार यांच्याशी मतभेदही झाले; पण एकमेकांबद्दलचा आदर कमी झाला नाही
 
Top