गेली
साडेपाच दशके देशाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण सहभाग घेतलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांची
राजकीय आत्मकथा ‘लोक माझे सांगाती..’ या नावाने राजहंस प्रकाशनातर्फे १० डिसेंबर रोजी
प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील काही निवडक भाग.. माझ्या विरोधी पक्षनेतेपदाच्या काळात
सोनियाजी आणि माझ्यात पहिली ठिणगी पडली, ती संसदीय समित्यांसाठी पक्षसदस्यांच्या नावांची
यादी सादर करण्याच्या मुद्दय़ावरून! पक्षाच्या अध्यक्ष त्या असल्यामुळे निरनिराळ्या
समित्यांवर कोण असावं, याबाबत मी त्यांच्याशी विस्तारानं चर्चा केली. त्यांच्या संमतीनं
सदस्यांची यादी ठरवली. निश्चित केलेल्या नावांची एक टंकमुद्रित प्रत तयार करून सोनियाजींना
पुन्हा दाखवली. त्यांनी ती यादी लोकसभेच्या सभापतींना सादर करण्यासाठी हिरवा कंदील
दाखवला. मग मी ती सभापतींकडे दिली. त्यावेळी लोकसभेचे सभापती होते जी. एम. सी. बालयोगी.
दुसऱ्या दिवशी बालयोगींचा मला फोन आला. त्यांनी विचारलं, ‘तुम्ही माझ्या कार्यालयात
येऊ शकता का?’ मी पोचलो. बालयोगी म्हणाले, ‘माझ्याकडे संसदीय समित्यांसाठीच्या काँग्रेस
सदस्यांच्या नावांच्या दोन याद्या आल्या आहेत.’ मी क्षणभर थांबलो. त्यांना म्हणालो,
‘तुम्ही काय म्हणता आहात, ते मी समजलो नाही.’ त्यावर ते म्हणाले, ‘काल तुम्ही माझ्याकडे
एक यादी सादर केली होती. त्यानंतर सभागृहातले काँग्रेसचे मुख्य प्रतोद थॉमस कुरियन
यांनीही एक यादी माझ्याकडे सादर केली आहे. तुम्ही आणि त्यांनी सादर केलेल्या यादीतल्या
नावांत फरक आहे.’ त्यांनी हे सांगितल्यावर काही क्षण मी स्तब्धच झालो. पण काहीही प्रतिक्रिया
चेहऱ्यावर उमटू दिली नाही. हा पक्षांतर्गत विषय होता. बालयोगींपाशी त्यावर काही शेरेबाजी
करणं उचित नव्हतं. मी एवढंच म्हणालो, ‘काहीतरी गैरसमज झाला असावा. तुम्ही मला कुरियन
यांच्या यादीची फोटो-कॉपी द्या. मी तुम्हाला काय ते कळवतो.’ मी तिथून बाहेर पडलो आणि
कुरियन यांच्याशी संपर्क साधला. कुरियन म्हणाले, ‘मी पक्षाध्यक्षांच्या सूचनेनुसार
यादी सादर केली आहे.’ मी त्यावर एवढंच म्हणालो, ‘यावर माझा विश्वास बसत नाही.’ कुरियन
म्हणाले, ‘यावर भाष्य करण्याइतपत मी पक्षात ज्येष्ठ नाही. तुम्ही मॅडमशीच बोला.’ मी
सोनियाजींची वेळ मागितली. त्यांना सांगितलं, ‘आपण आपसात चर्चा करून संसदीय समितीच्या
सदस्यांची नावं अंतिम केली आहेत. आणि तुमच्या संमतीनंतरच ती यादी सभापतींना सादर केली
आहे. असं असताना पक्षातर्फे आणखी एक यादी सादर केली गेली आहे. आपल्याला एक यादी मागे
घ्यावी लागेल. तुम्ही कुरियन यांना यादी मागे घेण्याच्या सूचना द्या.’ त्यावर त्या
म्हणाल्या, ‘त्यापेक्षा तुमची यादी मागे घ्या.’ मला हे धक्कादायक होतं. मी पक्षनेता
या नात्यानं निर्णय घ्यायला मुखत्यार होतो; पण पक्षाध्यक्षपदाची आणि संसदीय नेतेपदाची
प्रतिष्ठा राखण्यासाठी सारे सोपस्कार पार पाडल्यानंतर सोनिया गांधी यांनी मला यादी
मागे घ्यायला सांगणं अपमानास्पद होतं. माझ्या पदाच्या प्रतिष्ठेचं अवमूल्यन केल्याची
तीव्र भावना मनात घर करून बसली. अशा पक्षात काम करण्यात अर्थ नाही, या निष्कर्षांपाशी
मी आलो. या पक्षाचा सारा कारभार एकाच व्यक्तीच्या कलानं चालणार असल्यामुळे इथं भवितव्य
नाही याची खूणगाठ मी मनाशी बांधली. एकदा पक्षाच्या कार्यकारिणीच्या एका बैठकीत तामिळनाडूतल्या
अ. भा. अण्णा द्रमुकशी आघाडी करण्याच्या विषयावरून चर्चा सुरू होती. अण्णा द्रमुक मोजक्या
जागा सोडायला तयार होतं. मी म्हटलं, ‘देशातल्या प्रमुख राजकीय पक्षाला हाताच्या बोटांवर
मोजण्याइतपत जागा सोडणं अवमानकारक आहे. आपण अधिक जागांसाठी आग्रह धरला पाहिजे.’ पक्ष-कार्यकारिणीतल्या
बहुतेकांचं मतही असंच होतं. अण्णा द्रमुकच्या नेत्यांशी गुलाम नबी आझाद यांचे संबंध
चांगले आहेत असं त्यावेळी मानलं जात असे. त्यांनी बोलून मार्ग काढता येतो का ते पाहावं
असं ठरलं. त्यानुसार ते चेन्नईला गेले. पण अण्णा द्रमुकचं नेतृत्व काही बधलं नाही.
चेन्नईला जाऊन जयललिता यांच्याशी मी चर्चा करावी, असं कार्यकारिणीनं सांगितलं. मी गेलो
आणि अण्णा द्रमुकनं पंधरा जागा काँग्रेससाठी सोडायला मान्यता दिली. चेन्नईहून परतल्यावर
सोनियाजींची भेट घेऊन त्यांना ही माहिती दिली. सन्मान्य समझोता झाल्यानं त्यांनी समाधानही
व्यक्त केलं. त्यानंतर पक्ष-कार्यकारिणीची एक बैठक बोलावण्यात आली. १५ मे १९९९ रोजीच्या
बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेवर चर्चेसाठीचे दोनच मुद्दे होते. एक म्हणजे गोवा विधानसभेसाठीच्या
उमेदवारांच्या यादीला अंतिम स्वरूप देणं आणि दुसरा राष्ट्रीय जनता दल आणि अण्णा द्रमुकशी
निवडणूक समझोता करणं. बैठक सुरू झाल्यावर सोनियाजींनी अचानक एक कागद काढला आणि तो वाचायला
सुरुवात केली.. ‘माझा जन्म परदेशातला असून, निवडणूक प्रचाराचा हा मुद्दा झाल्यास त्याचा
पक्षाच्या कामगिरीवर काय परिणाम होईल याचा विचार एकत्रितपणानं करायला हवा. भाजपनं विदेशी
जन्माचा विषय निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनवलेला दिसतो आहे. यावर प्रत्येकानं आपलं मत
प्रांजळपणानं मांडावं.’ या प्रस्तावावर अर्जुनसिंह बोलले, ‘तुमचा जन्म परदेशातला असला
तरी तुम्ही लग्नानंतर हा देश स्वीकारला आहे. तुमच्या सासूबाई इंदिरा गांधी आणि पती
राजीव यांची निर्घृण हत्या झाल्यानंतरही तुम्ही देश सोडून जाण्याचा विचारही केलेला
नाही. देशाला जसं तुम्ही मनोमन स्वीकारलेलं आहे, तसंच देशानंही तुम्हाला मनापासून आपलं
मानलेलं आहे. तुम्ही राष्ट्रमाता आहात. देशाचं आणि पक्षाचं नेतृत्व तुम्हीच करायला
हवं.’ अर्जुनसिंह यांनी बैठकीचा नूर निश्चित केला होता. या विषयावर प्रांजळ मत नको
होतं, तुमची निष्ठा किती आहे, हे जोखण्याचा तो प्रयत्न होता. त्यानंतर ए. के. अँटनी,
गुलाम नबी आझाद, अंबिका सोनी यांनीही अर्जुनसिंह यांच्या भूमिकेला पुष्टी देत आपली
निष्ठा निíववाद प्रकट होईल अशीच भाषणं केली. हे झाल्यानंतर पी. ए. संगमा उभे राहिले.
ते सोनियाजींच्या अत्यंत विश्वासातले नेते होते. संगमा म्हणाले, ‘सोनिया गांधी परकीय
आहेत, हा आरोप शंभर टक्के होईल. जन्मानं भारतीय असणाऱ्या असंख्य व्यक्ती पक्षात असताना
आपण त्यांचा विचार न करता एका विदेशी व्यक्तीचा विचार करतो याचा अजिबातच परिणाम होणार
नाही असं मानणं भाबडेपणाचं ठरेल. पण आपण या टीकेला कसं उत्तर द्यायचं याची व्यूहरचना
करायलाच हवी.’ यानंतर तारीक अन्वर बोलले. संगमा यांनी जी भूमिका मांडली त्याच्याशी
आपण पूर्ण सहमत असल्याचं त्यांनी सांगितलं. आणखी काहीजणांनी आपापलं म्हणणं मांडल्यानंतर
शेवटी मी बोलायला उभा राहिलो. ‘गांधी कुटुंबाचं देशासाठीचं योगदान भारतीय जनता विसरेल
असं नाही. इंदिराजी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी केलेल्या बलिदानाविषयी आस्था असणारा
प्रचंड वर्ग काँग्रेसचा मोठा ठेवा आहे. त्यामुळे आपण अशा प्रचाराला प्रत्युत्तर देऊ
शकू. परंतु संगमा यांनी मांडलेल्या भूमिकेशी मी सहमत आहे. सोनियाजींच्या विदेशी जन्माच्या
मुद्दय़ाचा प्रचारात नक्की वापर केला जाईल. मात्र, या प्रचाराला आपण चोख उत्तरही देऊ
शकतो. पण असा प्रचार होणारच नाही असं मानणं म्हणजे आपण आपली दिशाभूल करणारं ठरेल.’
मग एका प्रसंगाचा मी उल्लेख केला. काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठात एका कार्यक्रमासाठी
गेलो असताना एका विद्याíथनीनं प्रश्न केला होता- ‘शंभर कोटी लोकसंख्या असलेल्या या
देशात काँग्रेसला जन्मानं भारतीय असलेला एकही नेता दिसत नाही का?’ नव्या पिढीतल्या
एका मुलीनं हा प्रश्न करावा, याचा अर्थ हा विषय जनमानसात पोचला होता. तो अग्रभागी राहील.
सातत्यानं मांडला जाईल. त्याच्यातून समज-गैरसमज निर्माण होतील. पण आपण निकरानं या प्रश्नाचा
सामना करू, असंही मी स्पष्ट केलं. हे उदाहरण सांगण्यामागचा उद्देशच मुळी सोनियाजींच्या
विदेशी जन्माचा मुद्दा प्रचाराचा मुख्य विषय कसा असणार आहे, हे अधोरेखित करण्यासाठी
होता. सर्वाच्या मांडणीनंतर पुढची काहीही चर्चा न होता बैठक संपली. बैठकीनंतर एक अस्वस्थ
शांतता होती. ताण स्पष्ट दिसत होता. अनेकांच्या मनात या विषयाबाबत भीती होतीच. पण परखडपणानं
हे सत्य आपल्या तोंडातून बाहेर पडणार नाही याची काळजी प्रत्येकानं घेतली. ‘तुमची भूमिका
शंभर टक्के खरी असली तरीही या पक्षात अशी ती उघडपणे मांडायची नसते..’ असे शहाणपणाचे
विचारही काही नेत्यांनी माझ्याशी व्यक्तिगत बोलताना सुनावले. काँग्रेस कार्यकारिणीची
बैठक संपली तरीही वात पेटलेली होती. चेंडू सोनियाजींच्या कोर्टात होता. कार्यकारिणीतल्या
दोन मतप्रवाहांबाबतीत त्यांची भूमिका निर्णायक ठरणार होती. दुपारी चारच्या विमानानं
मी पुण्याला आलो. विमानतळावर मला पत्रकारांनी गाठलं आणि ‘सोनिया गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा
राजीनामा दिला’ असं सांगितलं.. - See more at: http://www.loksatta.com/lekha-news/article-from-book-look-majha-sangati-book-based-on-sharad-pawar-1167213/#sthash.7iEdOC83.dpuf