असाच काही वेळ गेला आणि इतर आमदारांची भाषणं ऐकताना मी पुन्हा माझा एक पाय दुसऱ्या पायावर घेतला. आता मात्र सुरक्षारक्षक संतापला होता. असं न करण्याविषयी त्यानं आधीच दोन वेळा सूचना देऊन झाल्या होत्या. या वेळी तो तरातरा माझ्यापर्यंत आला आणि माझी कॉलर धरून त्यानं मला प्रेक्षक-गॅलरीच्या बाहेर काढलं. अशा तऱ्हेनं माझी सभागृहातून हकालपट्टी होण्याचा तो पहिला प्रसंग!

बारामतीला मॅट्रिक होऊन कॉलेजसाठी मी पुण्यात आलो आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बीएमसीसी या कॉमर्स कॉलेजमध्ये दाखल झालो. त्या काळी आजच्यासारखी तालुकापातळीपर्यंत कॉलेजं नव्हती. शिवाय, शिक्षणासाठी पुण्यात राज्याच्या सर्व भागांतून मोठ्या प्रमाणात मुलं यायची. त्यातल्या अनेकांचा वेगवेगळ्या वसतिगृहांमध्ये मुक्काम असायचा. पहिल्या वर्षापासूनच मी अशा पुण्याबाहेरच्या मुलांना एकत्र करून कॉलेजमधल्या मुला-मुलींची संघटना बांधायला सुरवात केली. अर्थातच कॉलेजमध्ये सीआर, जीआरच्या निवडणुका व्हायच्या. संख्येचं पाठबळ असल्यानं माझ्यासह अनेक मित्र या निवडणुका जिंकायचे. त्या काळी सगळ्या कॉलेजांमध्ये ‘पवार पॅनेल’ असा एक परवलीचा शब्द तयार झाला होता. बीएमसीसीमध्ये अनेक उपक्रमांमध्ये माझा सहभाग असायचा. मग व्याख्याते बोलावणं, एकांकिका, विविध खेळांचे सामने यांमध्ये मी गुंतून पडायचो. एकदा मी यशवंतराव चव्हाणसाहेबांना व्याख्यानासाठी आमंत्रित केलं होतं. प्रास्ताविक, भाषण, स्वागत वगैरे कामं माझ्याकडंच होती. त्यांच्या भाषणानं मी खूप प्रभावित झालो आणि माझा ओढा काँग्रेसकडं वाढू लागला.

समारंभानंतर चव्हाणसाहेबांनी मला बोलावून घेऊन आपुलकीनं माझी चौकशीही केली. मग पुण्यातून मी युवक काँग्रेसचा सचिव झालो आणि हळूहळू काँग्रेसचा प्रचारकही झालो. त्या काळी सार्वत्रिक निवडणुका आल्या, की माझ्यासह माझे मित्र विठ्ठल मणियार, धनाजी जाधव, श्रीनिवास पाटील हेही दिवस-रात्र काँग्रेसचा प्रचार करायचे. आम्हा सर्व कॉलेजच्या मुलांना पुण्यात सगळीकडं जाण्यासाठी सायकलीच असायच्या. एकेका सायकलवर डबलसीट बसून आम्ही रात्रीच्या वेळी भिंतींवर प्रचाराचे पोस्टर्स लावायचं काम करत असू. पोस्टरचा गठ्ठा सायकलच्या कॅरिअरवर बांधायचा आणि डब्यात खळ तयार करून बरोबर घ्यायची. पुण्याच्या एखाद्या पेठेत गेल्यावर पहिल्यांदा पोस्टर चिकटवण्यासाठीच्या जागा नक्की करायच्या. मग आम्ही भिंतीजवळ सायकल स्टॅंडवर लावायचो. रस्त्यावर पोस्टर अंथरून बरोबरचे दोघं जण पोस्टरला खळ लावायचे. एक जण सायकल धरायचा आणि मी सायकलच्या दांडीवर उभा राहून ती पोस्टर भिंतीवर चिकटवायचो. कदाचित इतरांच्यापेक्षा मी उंच असल्यानं ही कामगिरी मला पार पाडावी लागायची. रात्रीचे दहा वाजल्यानंतर पुढं रात्री दोन-तीन वाजेपर्यंत आम्ही असे पोस्टर लावण्याचं काम करत असू. त्यानंतर भूक तर लागलेली असायची; पण आम्हाला परवडेल असं एकच ठिकाण पुण्याच्या भाजीमंडईजवळ होतं. त्या ठिकाणी रात्री भाजीपाला यायचा म्हणून माल वाहणाऱ्यांची गर्दी असायची. मंडईजवळच्या ‘आसरा भुवन’ या हॉटेलात पाव आणि रस्सा मिळायचा. ही डिश सगळ्यांत स्वस्त होती. त्यामुळं पाव-रस्सा खाण्याचा कार्यक्रम आटोपल्यावर आम्ही पहाटेच्या सुमाराला पुन्हा वसतिगृहावर जायचो. या सर्व कामासाठी कार्यकर्त्यांनी पक्षाकडं पैसे मागण्याची त्या वेळी पद्धतच नव्हती. आमचा खर्च आम्ही कार्यकर्तेच करत असू. पुण्यात कॉलेजच्या वर्षांमध्ये आमची सायकलवर भटकंती सततची असायची. मला आठवतंय, त्या वेळी बी. आर. चोप्रा यांच्या ‘नया दौर’ या सिनेमाचं चित्रीकरण जेजुरीच्या परिसरात सुरू होतं. ‘नया दौर’ सिनेमातली दिलीपकुमार यांची घोडागाडी आणि जीवन (खलनायक) यांची मोटारगाडी यांच्यातल्या रेसचा उत्कंठावर्धक भाग चित्रित केला जात होता. आम्ही महाविद्यालयांतली सर्व मुलं सायकलींवरून जेजुरीला पोचून थोडंसं लांब उभं राहून ते सर्व बघत होतो. दिलीपकुमार आणि वैजयंतीमाला या पडद्यावरच्या अभिनेत्यांना आम्ही प्रत्यक्षात प्रथमच बघत होतो. तो आनंद काही वेगळाच होता. आयुष्यात पुढं मग मला राज्याचा प्रमुख म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली. त्या वेळी मी स्वतः आग्रहानं दिलीपकुमार या मोठ्या कलाकाराला सन्मानाचं मुंबईचे शेरीफ म्हणूनही नेमलं होतं.

बारामतीहून पुण्याला तर माझं बस्तान बऱ्यापैकी बसलं होतं; पण मुंबईला काही फारसं येणं-जाणं त्या काळी नव्हतं. त्यामुळं एकदा मुंबई सगळी हिंडून बघावी, अशी फार इच्छा होती. त्या वेळी आमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये एक पुण्याचे धनाजी जाधवही होते. पुण्याला येण्याअगोदर ते मुंबईला सिडनेहॅम कॉलेजमध्ये होते. मुळात मुंबई आणि त्यात पुन्हा सिडनेहॅम कॉलेज म्हणजे त्या काळी तर आम्हाला ते ऑक्‍सफर्ड वगैरेसारखं तालेवार वाटायचं. त्या वेळी धनाजींची मोठी बहीण मुंबईत राहत असे. त्यामुळं तिच्या घरी आमची उतरायची सोयही होणार होती. मग धनाजीच्या मार्गदर्शनाखाली आमची मुंबईची वारी ठरली. त्यांनी विचारलं ः ‘‘मुंबईत काय काय बघायचंय?’’ सांगितलं ः ‘‘मला मुंबईचा समुद्र बघायचा आहे.’’ त्याअगोदर मी समुद्र कधी बघितला नव्हता. पुढं सांगितलं ः ‘‘दुसरं म्हणजे, सांताक्रूझ विमानतळावर जाऊन तिथल्या प्रेक्षक सज्जातून विमानांची उड्डाणं बघायची आहेत. तिसरं म्हणजे, ट्रामनं प्रवास करायचा आहे आणि आणखी एक म्हणजे, महाराष्ट्राची विधानसभा बघायची आहे. आतमध्ये जाऊन प्रत्यक्ष कामकाजही बघायचं आहे.’’ आम्ही ठरल्याप्रमाणे मुंबईत डेरेदाखल झालो. मुंबईचं हे दर्शन म्हणजे माझ्यासाठी एक अपूर्वाई होती. विधिमंडळाचं अधिवेशनही सुरू होते. धनाजी यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. थोडी खटपट केल्यावर विधानसभेत प्रवेशाचे पास मिळविण्यात आम्ही यशस्वी झालो. ठरल्याप्रमाणे ओल्ड कौन्सिल हॉलमध्ये (सध्याचं राज्याचं पोलिस मुख्यालय) प्रवेश केला. त्या वातावरणाचा एक भारदस्तपणा अनुभवाला येत होता. आमच्या पासप्रमाणे आम्हाला प्रेक्षक गॅलरीत प्रवेशही मिळाला. तिथून सभागृहाचं कामकाजही दिसायचं आणि भाषणं ऐकायचीही सोय तिथं होती. मारोतराव कन्नमवार हे त्या वेळी मुख्यमंत्री होते आणि काँग्रेसचे बडे नेते सत्ताधारी बाकांवर, तर विरोधी बाकांवर आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, उद्धवराव पाटील यांच्यासारखे फर्डे वक्ते. मी अतिशय तन्मयतेनं ते सर्व ऐकत होतो. ऐकण्यात रमून जाताना खुर्चीवर बसल्या बसल्या अगदी सहजपणे मी माझा डावा पाय नकळतपणे उजव्या पायावर घेतला होता. लगेच सुरक्षारक्षक माझ्याजवळ आला आणि ‘दोन्ही पाय सरळ करून बसा,’ असा इशारा त्यानं मला दिला. मी नवखाच होतो. पाय सरळ करून बसलोसुद्धा. थोड्या वेळानं आता उजवा पाय मी डाव्या पायावर नकळतपणे ठेवला होता. झालं! रक्षक पुन्हा हजर. म्हणाला ः ‘‘एकदा सांगितलं ना, पाय सरळ ठेवून बसा म्हणून!’’ आपला आज्ञाधारकपणे पुन्हा पाय सरळ ठेवून बसलो. असाच काही वेळ इतर आमदारांची भाषणं ऐकताना पुन्हा माझा एक पाय आपला दुसऱ्या पायावर आला. आता मात्र सुरक्षारक्षक संतापला होता. तो तरातरा माझ्यापर्यंत आला आणि माझी कॉलर धरून त्यानं मला प्रेक्षक गॅलरीच्या बाहेर काढलं. अशा तऱ्हेनं माझी सभागृहातून हकालपट्टी होण्याचा तो पहिला प्रसंग! त्याच वेळी मी नक्की केलं, की आता यापुढं विधानसभेच्या प्रेक्षकगॅलरीत कधीही प्रवेश करायचा नाही, तर थेट मुख्य सभागृहातच प्रवेश करायचा! सुदैवानं बारामतीच्या मतदारांनी मला भरघोस मतं दिली आणि सहा वर्षांनी त्यांचा प्रतिनिधी म्हणून मला विधानसभेत जाण्याची संधी उपलब्ध करून दिली. काही वर्षांनी त्याच जुन्या कौन्सिल हॉलमध्ये राज्याचा प्रमुख म्हणून बसण्याचा मानही मला मिळाला. त्या वेळी लोकशाहीच्या मंदिरात मला प्रवेश मिळाला, तो आजपर्यंत ४८ वर्षं कायम राहिला.
 
Top