दुबई आणि लंडन इथं प्रतापराव शिर्के यांनी आपल्या उद्योगाचा विस्तार केला. दुबईतल्या राजाचा विश्वास त्यांनी आपल्या कामातून संपादन केला होता. त्यानंतर लंडनमध्ये जाऊन ‘शिप्स मॅनेजमेंट’मध्ये त्यांनी लक्ष घातलं. आज ते लंडनमधून जगभरातल्या २५०-३०० मालवाहू जहाजांचे मॅनेजमेंट करण्याचं काम करतात. या उद्योगाच्या विस्ताराच्या निमित्तानं त्यांची ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर इथं मोठी कार्यालयं आहेत. सतत नव्या उद्योगाचा ध्यास घेणारे प्रतापराव आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर यशस्वी होत पुढं गेले.
आत्तापर्यंतच्या माझ्या सार्वजनिक जीवनात राज्यातील आणि देशातल्याही अनेक उद्योग घराण्यांशी संबंध आला. अगदी किर्लोस्कर, बजाज, अजित गुलाबचंद यांच्यापासून देशातल्या सध्याच्या मोठ्या उद्योगपतींपर्यंत. त्यांच्यावर काही वेळा आलेली संकटं, त्यांचा सामाजिक कार्यातला सहभाग अशी विविध रूपं आहेत. कष्टानं आणि स्वकर्तृत्वानं मोठे झालेले एक उद्योगमहर्षी म्हणजे बी. जी. शिर्के. ते स्वतः अगदी सामान्य कुटुंबातले. मूळ गाव पसरणी. सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातलं हे गाव. शिक्षणासाठी पुण्यात आले आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य शास्त्राची पदवी संपादन केली. नोकरी करायची नाही ही त्यांची जिद्द होती. थेट बांधकाम व्यवसायात त्यांनी उडी घेतली. छोटी-मोठी कामं करत त्यांनी ‘सिपोरक्स’ हा बांधकामासाठी लागणाऱ्या मटेरिअलचा मोठा उद्योग उभारला.
प्रतापराव शिर्के : दुबई, लंडन इथं आपल्या कामाचा ठसा उमटवला.
अतिशय स्वच्छ कारभार आणि गुणवत्तेमध्ये कुठलीही तडजोड नाही, हाच मुळी त्यांच्या उद्योगाचा भक्कम पाया होता. आता त्यांच्या पुढच्या पिढीनं मोठा विस्तार करून देशात अनेक ठिकाणी मोठे बांधकाम प्रकल्प उभारले आहेत. बी. जी. शिर्केंचे ज्येष्ठ चिरंजीव प्रतापराव शिर्के यांनीही पुण्यातच अभियांत्रिकीची पदवी घेतली. आपल्या वडिलांप्रमाणेच त्यांनीही ठरविलं होतं, की नोकरी करायची नाही; पण स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा. पदवी घेऊन बाहेर पडले तेव्हा बांधकाम व्यवसायात मंदीची लाट होती. त्यामुळं नवी कामे मिळण्यावर मर्यादा होत्या. कुठं तरी देशाबाहेर उद्योग सुरू करता येईल, असं त्यांच्या मनात आलं. युरोप - अमेरिका आदी भागांत जाणं अवघड वाटत होतं. मग त्यांनी निवड केली, ती दुबईची. त्या वेळी दुबई भरभराटीला आलेली नव्हती. दुबईच्या आसपास तेलसाठ्यांचा शोधही नुकताच लागला होता. एका अर्थानं दुबई म्हणजे त्या वेळी प्रचंड वाळवंट आणि मागास प्रदेश. दुबईला आपण घरं बांधू, असं मनाशी ठरवून प्रतापराव पोचले होते. अरब देशांमध्ये राजे-महाराजे असतात. दुबईचे राजे त्या वेळी होते शेख रशिद. राजाच्या सांगण्याप्रमाणे सगळा कारभार चालत असे. कुणा नवीन माणसाला काम हवे असेल तर थेट राजवाड्यावर शेख रशिद यांनाच भेटावं लागत असे. प्रतापराव राजवाड्यापर्यंत पोचले. परंतु, त्यांना आतमध्ये प्रवेश मिळत नव्हता. ते राजवाड्याच्या बाहेर भेटीसाठी सतत चार दिवस बसून राहायचे. शेख रशिद यांना गाडीतून जाताना ते बसलेले दिसायचे. असेच ३-४ दिवस गेल्यानंतर त्यानी गाडी थांबवून चौकशी केली. प्रतापरावांना बांधकाम करण्याचं काम हवं होतं. मग त्यांना राजवाड्यावर बोलावणं आलं. शेख रशिद यांनी पहिला प्रश्न केला, की तुमच्या हाती भांडवल काय आहे. प्रतापरावांनी सांगितलं, माझ्या हाती भांडवल नाही, पण माझी भरपूर कष्ट करण्याची तयारी आहे. शेवटी त्यांना नाराज करायचं नाही म्हणून एक ५-१० घरांचं काम राजानं देऊ केलं. प्रतापरावांनी सांगितलं, की एवढ्याशा कामासाठी मला भारतातून कारागीर आणणं परवडणार नाही. त्यापेक्षा मोठं काम हवं आणि त्यासाठी थोड्याफार ॲडव्हान्स रकमेचीही गरज आहे. राजाच्या मनात काय आलं कुणास ठाऊक त्यानं जवळपास १०० घरांच्या बांधकामाचं काम दिलं आणि ॲडव्हान्सही दिला. प्रतापरावांनी जिद्दीनं, लगोलग सगळी जमवाजमव करून दिलेल्या वेळेच्या अगोदर उत्कृष्ट घरं बांधली. जाण्या-येण्याच्या रस्त्यावरच हे काम असल्यामुळं शेख रशिद अधूनमधून गाडीतून उतरून बांधकामाच्या दर्जाची पाहणीही करायचे. एकूणच हे काम वेळेअगोदर आणि उत्कृष्ट दर्जाचं झाल्यानं प्रतापरावांनी राजाचा विश्वास संपादन केला होता. या कामाची राहिलेली शेवटची रक्कम सुमारे १० हजार दिनारच्या आसपास होती. राजानं त्याप्रमाणे त्यांना बॅंकेचा धनादेश दिला.
प्रतापराव बॅंकेमध्ये पैसे काढण्यासाठी पोचले तर बॅंकेच्या कॅशिअरने त्यांना एक लाख दिनार दिले! प्रतापरावांनी धनादेश उघडून सुद्धा बघितला नव्हता. परंतु, त्यांनी कॅशिअरला सांगितलं, की काहीतरी चूक झाली असावी आणि चुकून १ शून्य जादा पडलं असावं, त्यामुळं ते पैसे न घेता, प्रतापराव पुन्हा चेक दुरुस्त करण्यासाठी राजवाड्यावर गेले. शेख रशिद यांनी त्यांना सांगितलं, की ही एकप्रकारे तुझ्या सचोटीची परीक्षा होती. दुसरा कोणी विनाकष्टाचे एवढे पैसे मिळाले तर सहज घेऊन गेला असता. पुढं याच सदिच्छेच्या जोरावर त्यांनी प्रतापरावांना मोठ्या प्रमाणात दुबईमध्ये घरबांधणीचे प्रकल्प उभे करण्यास सांगितलं. प्रतापरावांची सांपत्तिक स्थितीही सुधारली. दुसरीकडे शेख रशिद वयोमानाप्रमाणं थकत चालले होते आणि पुढच्या पिढीतले राजकुमार दुबईच्या कारभारात लक्ष घालू लागले होते.
राजकुमारांच्या मनात या एकाच माणसाला आपले वडील काम देतात याबद्दलची असूयाही होती. प्रतापरावांनी भविष्याचा विचार केला आणि पुढची पिढी जर राजाप्रमाणे वागली नाही तर आपला व्यवसाय संकटात येऊ शकतो हेही त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी पुन्हा एकदा धाडसी निर्णय घेतला, की दुबईतील व्यवसाय थांबवायचा आणि आपलं बस्तान दुसऱ्या देशात न्यायचं. त्याप्रमाणे ते दुबई सोडून थेट लंडनला आले. त्या वेळी इंग्लंडमधल्या बांधकाम व्यवसायाची फारशी माहिती त्यांनी जमवलेली नव्हती. परंतु लंडनच्या आसपास ४०-५० कि.मी.च्या परिसरात छोटी-छोटी हॉटेल्स किंवा मॉटेल्स चांगला व्यवसाय करू शकतात, असं त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी या परिसरात १०-१५ हॉटेल्स खरेदी केली आणि हा नवा व्यवसायही चांगल्या पद्धतीनं सुरू केला. आता लंडनमध्ये असताना अनेक वेळा बाहेर फिरताना त्यांना समुद्राकडं आणि बंदराकडं जाण्याचा छंदही होता. मालवाहतूक करणारी प्रचंड जहाजे त्यांना नेहमी दिसत असत. आता एका नव्या विचारानं त्यांच्या मनात घर करायला सुरवात केली होती. आपण शिपिंगच्या व्यवसायात उतरावं असं त्यांना वाटू लागलं, पण मालवाहतूक करणाऱ्या जहाजांच्या किमती प्रचंड होत्या आणि तेवढी गुंतवणूक करण्याइतकं भांडवल उभं करण्यात अडचणीही होत्या. तरीसुद्धा त्यांनी थोडा धोका पत्करून २ जहाजं विकत घेतली आणि व्यवसाय सुरू केला. बंदरातून माल जहाजात चढवायचे मग समुद्रातून तो दुसऱ्या बंदरात पोचवायचे. तिथं तो उतरविणे या संबंधीची संपूर्ण आखणी त्यांनी बारकाईने अभ्यासली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची जहाजं या व्यवसायात आहेत. परंतु, त्यांचं योग्य पद्धतीनं व्यवस्थापन होताना दिसत नाही.
आपण जहाजं खरेदी करण्यात गुंतवणूक करण्यापेक्षा ‘शिप्स मॅनेजमेंट’ या विषयावर लक्ष केंद्रित करून नव्या पद्धतीचं काम उभं करू शकू, जेणेकरून अनेक जहाजांचे मालक आपल्याला त्यांच्या जहाजांची मॅनेजमेंट करण्याचं काम देतील, असा त्यांना विश्वास होता. हा नवा व्यवसाय त्यांनी लंडनमध्ये सुरू केला आणि थोड्याच कालावधीत त्याचा विस्तार व्हायला सुरवात झाली. आज प्रतापराव शिर्के हे लंडनमधून जगभरातल्या २५०-३०० मालवाहू जहाजांची मॅनेजमेंट करण्याचं काम करतात. या उद्योगाच्या विस्ताराच्या निमित्तानं त्यांची आज ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर इथं मोठी कार्यालये आहेत. सतत नव्या उद्योगाचा ध्यास घेणारे प्रतापराव आज आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर यशस्वी होत पुढं गेले. आज थोडेसे वार्धक्याकडे झुकलेले प्रतापराव लंडनजवळ सुमारे ३०-४० कि.मी. अंतरावर आपल्या स्वतःच्या प्रशस्त बंगल्यात राहतात. आपल्या जीवनात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं वागणारा हा माणूस एरवी अगदी सर्वांसारखं जगतो. आजही सकाळी ऑफिसला जायची वेळ झाली, की स्वतःची ब्रिफकेस हातात घेऊन ते इतरांसारखेच लंडनच्या मेट्रो ट्रेननं आपले कार्यालय गाठतात. आपल्या या व्यावसायिक यशाबरोबरच त्यांनी मराठी मातीशी आणि माणसाशी आपलं नातं राखून ठेवलं आहे. आज कुणीही असा धडपडणारा किंवा एखाद्या क्षेत्रातला कलाकार मग तो गायक असेल, वादक असेल किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणारा असेल तर त्याच्या पाठीमागे उभं राहून त्याला मोठं करणं हा त्यांनी जोपासलेला एक छंद आहे. सचोटीचा व्यवहार, पारदर्शक कारभार आणि अत्यंत साधी राहणी यामुळं उद्योग जगतातले प्रतापरावांचं स्थान मला नेहमीच आकर्षित करतं आणि जेव्हा केव्हा लंडनला जायची संधी मिळते त्या वेळी मी प्रतापरावांची अगत्यानं भेट घेतो. अधूनमधून तेही भारतात आले, की आमच्या भेटीगाठी होतात.