
सन १९६७ च्या निवडणुकीत बारामतीचा प्रतिनिधी म्हणून माझा विधिमंडळात प्रवेश झाला. त्यापूर्वी महाविद्यालयीन काळातच मी काँग्रेस पक्षाच्या युवक संघटनेत काम करत होतो. त्याकाळी यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा, विचारांचा माझ्यावर मोठा प्रभाव होता. चव्हाणसाहेब पुण्यात आल्यानंतर मी त्यांच्याबरोबर असे. त्यांचा राजकारणापलीकडच्या अनेक क्षेत्रांतल्या महत्त्वाच्या व्यक्तींशी असलेला स्नेह अचंबित करणारा होता. साहजिकच चव्हाणसाहेबांमुळं माझ्याही भेटी किसन वीर, ग. दि. माडगूळकर, नरुभाऊ लिमये अशा आगळ्यावेगळ्या लोकांशी होत असत. अशाच लोकांमधले एक म्हणजे परखड आणि स्वच्छ विचारसरणीचे पत्रकार नरुभाऊ लिमये.

पुण्याच्या सदाशिव पेठेतल्या माडीवाले कॉलनीत नरुभाऊ राहत असत. दोन खोल्यांचं छोटंसं घर, अत्यंत साध्या पद्धतीचं राहणीमान. स्पष्टवक्तेपणा आणि परखडपणा रोमारोमात ठासून भरलेला. नरुभाऊ हाडाचे पत्रकार; त्यामुळं त्यांची दृष्टी साफ. त्यातून निर्माण होणारी मतं रोखठोक असायची. चव्हाणसाहेबांना नरुभाऊ हे राजकारणातला एक सच्छील नेता मानत असत. महाराष्ट्र देशात आघाडीचं राज्य होतं. ते टिकण्यामागं चव्हाणसाहेबांचं नेतृत्व राज्याला लाभलं, याचा अभिमान त्यांच्या बोलण्यात असायचा. नरुभाऊ मूळचे साताऱ्याचे आणि स्वातंत्र्यचळवळीतले चव्हाणसाहेबांचे सहकारी. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नरुभाऊंसारख्या अनेक ज्येष्ठांनी स्वतंत्र भारत सुजलाम् सुफलाम् होण्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन केलं. त्यांनी कधीही सत्तेची पदं घेतली नाहीत. कुठलाही स्वार्थ साधायचा नसल्यानं सत्ताधारी कुठं चुकले, तर त्यांना योग्य भाषेत फटकारण्यात नरुभाऊंची लेखणी कधीही कमी पडली नाही. सत्ताधाऱ्यांना ते नेहमी खरमरीत पत्रं पाठवायचे.

जी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्यासह अनेक नेत्यांना त्यांची पत्रं जायची. पत्रातल्या आशयावरून या नेत्यांबद्दल त्यांच्या मनात असलेली तळमळ व्यक्त होत असे. त्यामुळं साहजिकच नरुभाऊंना एक नैतिक अधिकार प्राप्त झालेला होता. चव्हाणसाहेबांचा विचार घेऊनच मी राजकारणातली पावलं टाकावीत, यासाठी ते कायम आग्रही असायचे; त्यामुळं पुण्यात आल्यानंतर कित्येक वेळा मी नरुभाऊंना भेटत असे. बऱ्याच वेळा आमचे मतभेदही व्हायचे. मग नरुभाऊ पत्र लिहून त्यांची नाराजी मला कळवत असत. त्यांना न आवडलेले माझे निर्णय त्या त्या परिस्थितीत का घ्यावे लागले, हे मी त्यांना पुढं मग कधीतरी सांगत असे. १९८० ते १९८८ या काळात नरुभाऊंनी माझी वैचारिक पाठराखण केली. १९८८ मध्ये मी पुन्हा काँग्रेसचा मुख्यमंत्री झालो, याचा त्यांना आनंद झाला होता. त्या वेळी त्यांची प्रतिक्रिया फार बोलकी होती. ‘आता महाराष्ट्राला बरे दिवस येतील,’ एवढंच माफक कौतुक. मी मुख्यमंत्री असताना राज्याच्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी शेजारच्या गोवा राज्याप्रमाणे कॅसिनो सुरू करण्याबाबत चर्चा सुरू केली होती. अर्थात, हे कॅसिनो मुंबईजवळच्या अरबी समुद्रात तरंगत्या जहाजाच्या स्वरूपात असणार होते. ही चर्चा विधान परिषदेत सुरू असताना त्या वेळी आमदार असलेल्या नरुभाऊंनी जोरदार टीका करून सरकारला बजावलं होतं ः ‘‘या राज्यात काय तुम्ही रम, रमा आणि रमीची संस्कृती आणण्याचं ठरवलं आहे काय?’’ त्यांना जे अयोग्य वाटलं होतं, त्याविषयी त्यांनी इतक्या स्पष्टपणे सांगितलं होतं.

उतारवयात पत्रकारितेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाची जबाबदारी घेतली. आर्यभूषण प्रेस डबघाईला आला होता. तीन-चार वर्षं मेहनतीनं त्यांनी तो नफ्यात आणला. वय पुढं जात होतं; पण निवृत्तीचा त्यांचा तसा विचार नव्हता. सकाळी नऊच्या ठोक्याला ते नियमानं प्रेसवर जायचे. एकदा तिथल्या कामाचं नियोजन झालं, की नरुभाऊंचा पत्रप्रपंच सुरू होई. सायंकाळी मात्र डेक्कन जिमखाना क्लबवर जाऊन पत्त्यातला ब्रिजचा डाव त्यांचा कधी चुकला नाही. अनंतराव पाटील हे त्यांचे हक्काचे भिडू. नरुभाऊंना मूल-बाळ नव्हतं; पण त्यांच्या मित्राच्या मुलाकडं - दिलीप पुंडे यांच्याकडं - ते राहत असत आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अगदी वडिलांसारखी त्यांची सेवा केली. गांधीवादी विचारसरणीत वाढलेल्या, प्रत्यक्ष स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या नरुभाऊंना अलीकडच्या काळातल्या नेत्यांची वर्तणूक दुखावून जात असे. स्वातंत्र्यसैनिक, परखड पत्रकार, नाट्यरसिक, व्यवहारचतुर असा हा मार्गदर्शक होता. त्यांच्याबरोबरच्या गप्पांमध्ये कधीही वयाचा विचार नसे. गप्पा चालू असतानाही बॅकग्राउंडला पंडित भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, वेगवेगळ्या संगीतनाटकांमधली पदं सोबतीला असायची. बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या साताऱ्याच्या लिमये कुटुंबात जन्मलेल्या नरुभाऊंचं जीवन म्हणजे एखाद्या निर्मळ स्फटिकासारखा झराच होता जणू काही. स्वतःची आत्मशक्ती आणि आचार-विचारांशी प्रामाणिक राहून व्रतस्थ जीवन जगणारे नरुभाऊ पूर्णतः समाधानी होते. माझ्या आयुष्यात मी कुठं जर चुकत असेन तर तसं स्पष्टपणे सांगणारे आणि हक्काचं नातं जपणारे नरुभाऊ म्हणूनच आजही माझ्या स्मरणात असतात.