पुणे, दि. २९ (प्रतिनिधी) – शरद पवार यांना राजकारणातील सर्व पदे मिळाली आहेत, केवळ एक पद शिल्लक आहे. ममता, जयललिता, लालूप्रसाद या सर्वांना एकत्र करून, तिसर्‍या आघाडीचे नेतृत्व करून देशातील एक नंबरचे पद शरद पवार यांनी भूषवावे, असे मत माजी मंत्री पतंगराव कदम यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या वतीने लोकनेते शरद पवार अभीष्टचिंतन सोहळा व ‘शरदराव पवार : अ मास लिडर’ या इंग्रजी भाषांतरित पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पतंगराव कदम बोलत होते. महापौर दत्तात्रेय धनकवडे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, उद्योजक प्रतापराव पवार, डॉ. अनिल पाटील, डॉ गणेश ठाकूर, विजय कोलते यावेळी उपस्थित होते. पतंगराव कदम म्हणाले, गेल्या ४० वर्षांपेक्षा जास्त काळापासून शरद पवार आणि माझे राजकारणापलीकडचे संबंध आहेत. देशातील व राज्यातील संवेदनशील प्रकरणे कशी हाताळायची, तोडगा कसा काढायचा याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला होता. त्यावरून त्यांचे एक पाऊल समाजासोबत तर एक पाऊल भविष्यासोबत असल्याचे दिसते. डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, शरद पवार हे केवळ निवडणुकीचा विचार करणारे राजकारणी नसून, भावी पिढीच्या भविष्याचा विचार करणारे समाजकारणी आहेत. प्रचंड वाचन आणि अभ्यासामुळे त्यांना विज्ञानामधील नवीन बदलाचीही माहिती असायची. १९९८ मध्ये हैदराबाद येथे झालेल्या मराठी जागतिक परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी मला दिले. पवार हे बुद्धिमान, अभ्यासू आहेतच; पण दैवी शक्तीही त्यांच्याबरोबर आहे. प्रतापराव पवार म्हणाले, शरद पवार यांच्यावर राजकारणात ते पब्लिक प्रॉपर्टी असल्यासारखी टीका होते, कुटुंबीयांना वेदनाही झाल्या; पण त्यांनी कधीही उलट उत्तर दिले नाही. आम्ही कधीही इतर व्यक्तींवर टीका करत नाहीत. - See more at: 
 
Top