मुंबई - ""भारत हा सहिष्णू देश आहे. विविधता हा या देशाचा पाया आहे; पण सध्या भारताला हिंदू राष्ट्र करण्याचा अट्टहास सुरू असून, ही भावना देशासाठी घातक आहे,‘‘ अशा शब्दांत "राष्ट्रवादी‘चे अध्यक्ष शरद पवार यांनी आज देशभरातील साहित्यिकांच्या बैठकीत उमटलेल्या भावनेचे समर्थन केले. आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये देशभरातील 70 इतिहास संशोधक व साहित्यिकांची शरद पवार यांच्या सोबत तब्बल पाच तास मॅरेथॉन बैठक झाली. या वेळी देशात सध्या वस्तुनिष्ठ इतिहासाचे विद्रूपीकरण सुरू असल्याची खंत या इतिहास तज्ज्ञांनी व्यक्त केली.
सध्या वस्तुनिष्ठ इतिहासात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्याचा डाव खेळला जात असून, महापुरुषांचे संदर्भदेखील हिंदुराष्ट्राशी जोडले जात असल्याचे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले. दलित, आदिवासी, वंचित, उपेक्षित यांचा खरा इतिहास बदलण्याचे षड्यंत्र सुरू असून, राष्ट्रीय संदर्भग्रंथामध्ये हा बदल छुप्या पद्धतीने होत असल्याचा आक्षेप या इतिहास तज्ज्ञांनी घेतला. भारतीय इतिहासाचे विद्रूपीकरण रोखावेच लागेल, असा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
यावर बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रीय स्तरावरील इतिहास संशोधन संस्था स्थापन करण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये यासाठीची वेगळी यंत्रणा तयार करण्यास हरकत नसल्याचेही स्पष्ट केले.
मात्र, भारताला हिंदुराष्ट्र म्हणून जगाच्या समोर स्थापित करणाऱ्या शक्तींचा बिमोड करावाच लागेल. त्यासाठी देशभरातल्या इतिहास तज्ज्ञ व संशोधकांनी राष्ट्रव्यापी चळवळ उभारल्यास सहकार्य करण्याची ग्वाही पवार यांनी दिली.
इतिहासाचा गैरवापर करून हिंदुराष्ट्र म्हणजेच भागवत राष्ट्र, अशी व्याख्या करण्याचा खटाटोप सुरू असल्याचा सूरही या वेळी लावण्यात आला. तब्बल 58 वर्षांनंतर अशाप्रकारे देशभरातल्या इतिहास तज्ज्ञ व संशोधकांनी एकत्र येऊन विचारमंथन केल्याने आगामी काळात सांस्कृतिक संघर्ष शिगेला पोचेल, असे मानले जात आहे.
या बैठकीला इशरत आलम, डॉ. डेव्हिड, डॉ. शेषन, शिरीन मुसवी, प्रो. श्रीसंत, इंद्रजित सावंत, डॉ. मोलानी, श्रीमंत कोकाटे, प्रा. घोघरे यांसह सुमारे 70 इतिहास संशोधकांनी उपस्थिती लावली.