मुंबई -  केंद्र व राज्य सरकारने भुजबळ कुटुंबीयांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात धडक अटकसत्र सुरू केल्याने आज राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत या कारवाईचा निषेध केला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत सरकार सुडाचे राजकारण करत असल्याची टीका केली. ‘‘महाराष्ट्र सदन प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांविरोधात तक्रारी करणारी मंडळी ही एका राजकीय पक्षाची आहेत. या नेत्यांकडून वारंवार विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकण्याची वक्तव्य केली जात असून, त्यांच्याकडून तपास यंत्रणेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे,’’ असा आरोप पवार यांनी केला. 

पवार म्हणाले, ‘‘महाराष्ट्र सदनप्रकरणी भुजबळ कुटुंबीयांना जाणूनबुजून ‘टार्गेट’ केले जात आहे. एकाच आरोपाखाली एका कुटुंबाची तीन वेळा चौकशी कशी काय केली जाते? ‘ईडी’तर्फे सुरू असलेल्या चौकशीला पूर्ण सहकार्य करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयारी आहे.’’


‘‘भुजबळ यांनी मंत्रिपदावर असताना जे जे निर्णय घेतले, ते त्यांचे एकट्याचे नव्हते, तर ते संपूर्ण मंत्रिमंडळाचे होते. भुजबळ कुटुंबीयांविरोधात तक्रार देणारे एकाच पक्षातील आहेत. एका खासदाराच्या इशाऱ्यावरून तपास यंत्रणा काम करीत आहे, आमची भूमिका स्वच्छ असल्याने आम्हाला काळजी करण्याचे कारण नाही’’ असे पवार यांनी स्पष्ट केले. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नाने १९९५ मध्ये युती सरकार सत्तेत आले. परंतु त्या काळात सत्तेचा वापर विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी कधी झाला नव्हता, असे पवार म्हणाले. 


भेदभाव करणारा देव मानत नाही
शनी-शिंगणापूर देवस्थान प्रकरणात मध्यस्थी करणार का? या प्रश्नांवर  बोलताना पवार म्हणाले, ‘‘याप्रकरणी मी मार्ग काढण्याच्या प्रयत्नात पडणार नाही. कारण, जो देव स्री-पुरुष भेदभाव करतो, अशा देवाला मी मानत नाही. तरीपण मी शंकरराव गडाख यांच्याशी बोलून त्यांना मार्ग काढायला सांगतो.’’

 
Top