पुणे - माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी नेहमी देशहिताला महत्त्व दिले आहे. त्यासाठी त्यांनी कधीही मानापमानाचा किंवा पक्षाचा विचार केला नाही. त्यांना ‘जाणता राजा’ का म्हणतात याची मला वेळोवेळी प्रचिती आली आहे. विकासासाठी मोठे पदही सोडणाऱ्या श्री. पवार यांच्याविषयी नेहमीच अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय अर्थ सचिव विजय केळकर यांनी काढले. श्री. पवार देशाचे पंतप्रधान व्हावेत, अशा सदिच्छाही त्यांनी या वेळी व्यक्त केल्या.
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याबरोबर प्रशासनात तसेच खासगी सचिवपदाची जबाबदारी पार पाडणाऱ्या सचिवांच्या नजरेतून श्री. पवार ही मध्यवर्ती संकल्पना असणाऱ्या ‘सुशासन आणि संवाद’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (ता. २४) श्री. केळकर यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, महापौर दत्तात्रय धनकवडे, प्रतिष्ठानचे लक्ष्मीकांत खाबिया, राहुल देशपांडे उपस्थित होते.
केळकर म्हणाले, की मी वित्त सचिव असताना श्री. पवार विरोधी पक्षनेते होते. १९९९-२००० चे बजेट होते. ते मंजूर करण्याच्या वेळी पेच निर्माण झाला. एआयडीएमके पक्षाने पाठिंबा काढला आणि सरकार अल्प मतात गेले. अर्थव्यवस्था अडचणीत असल्याने बजेट पास होणे आवश्‍यक होते. त्या वेळी पंतप्रधानांच्या सूचनेवरून श्री. पवार यांना भेटलो. बजेट पास करून राष्ट्रपती राजवट सुरू करण्याचा निरोप दिला. त्या वेळी पक्षहिताचा विचार न करता पवार यांनी त्याला पाठिंबा दिला. बिल पास झाले अाणि संसद बरखास्त झाली.
भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) अध्यक्षपद कृषी मंत्र्यांकडे असताना, संस्थेचे आर्थिक सल्लागार असणारे अर्थमंत्री बैठकांना उपस्थित राहत नव्हते. निधी मिळत नसल्याने सर्व काम ठप्प झाले होते. आयसीएआरचे अध्यक्षपद कृषिमंत्र्यांऐवजी पंतप्रधानांना देण्याचा विचार पुढे आला. या वेळी श्री. पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यास मान्यता दिली. एवढ्या मोठ्या संस्थेच्या अध्यक्षपदापेक्षा त्यांनी संस्थेचे काम पुढे जाईल याला प्राधान्य दिले. त्यामुळे त्यांना ‘जाणता राजा’ का म्हणतात याची प्रचिती आल्याचे केळकर यांनी सांगितले.
या वेळी प्रतापराव पवार म्हणाले, की पक्षीय राजकारणात स्पर्धा असते. विरोधी पक्ष आणि पक्षातील राजकीय विरोधक नेहमी टीका करत असतात. या स्पर्धेतून पुढे जाणारी व्यक्ती टिकते. प्रत्येक नेत्यामध्ये गुण-दोष असतात. कोणीही एका दिवसात मोठे होत नाही. शरद पवार यांनी कधीही कोणाबद्दल कटुता व्यक्त केली नाही. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारी अनेक माणसे आहेत. ही विश्‍वासार्हता सहज मिळत नाही, असेही श्री. पवार यांनी सांगितले.
या वेळी श्री. पवार यांचे स्वीय सहायक सतीश राऊत, श्री. खाबिया, श्री. देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रणित कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, तर नीलेश जेधे यांनी आभार मानले . 

साभार ईसकाळ 
 
Top