शरद पवार यांनी आपल्या स्नेहानं असंख्य माणसं जोडली. राजकारणापलीकडं जाऊन. त्यांनी हा स्नेह माणुसकीच्या नात्यानं जपला. राजकारणातले त्यांचे असेच दोन स्नेही म्हणजे ओडिशाचे माजी मुख्यमंत्री दिवंगत बिजू पटनाईक आणि माजी रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस. त्या दोघांविषयी...

भारतीय राजकारणातली वैविध्य असणारी व्यक्तिमत्त्वं त्यांच्या आगळ्यावेगळ्या गुणांनी माझ्या मनात घर करून राहिली आहेत. ओडिशाचे दिवंगत माजी मुख्यमंत्री बिजू पटनाईक हे त्यांपैकीच एक. त्यांना सारे प्रेमानं ‘बिजूदा’ म्हणायचे. माझ्या राजकीय आयुष्यात बिजूदांचा खास कोपरा आहेच. आमच्या वयात २४ वर्षांचं अंतर होतं; पण ते अंतर मिटवून मैत्री करण्याची विलक्षण हातोटी त्यांना अवगत होती. बिजूदांशी माझा संपर्क आला तो त्यांचा मुलगा प्रेम याच्यामुळं. दिल्लीवारीत उद्योजक ललितमोहन थापर यांच्या घरी माझी आवर्जून फेरी असे. किंबहुना दिल्लीतल्या राजकीय भेटी-गाठींपलीकडचं स्नेहाचं एकमेव घर ललित थापर यांचं होतं. त्यांच्याकडंच माझी प्रेमशी मैत्री जुळली. त्याचं त्यांच्याकडं कायम येणं-जाणं होतं. प्रेमला ‘गुड्डू’ म्हणत असत. त्यानंच माझा बिजूदांशी परिचय करून दिला. काही नाती सहजपणानं आपलीशी होतात. बिजूदांच्या बाबतीत नेमकं हेच झालं. प्रेमचा मित्र असल्यानं माझ्याशीही ते मुलाच्या मायेनंच वागत.

माझ्या तरुण वयात भुवनेश्‍वरला झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनातलं त्यांचं ते भव्य, रुबाबदार रूप माझ्या मनात ठसलं होतं. प्रत्यक्ष भेटी-गाठीनंतर तर त्यांच्यावर मी बेहद्द खूश होतो. ते विविधांगी होते. स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग असलेल्या बिजूदांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजकारणात प्रवेश केला. ‘कलीग स्टील’ आणि ‘कलीग एव्हिएशन’ अशा दोन कंपन्या त्यांनी सुरू केल्या आणि राजकारणासाठी पैसा हवा म्हणून त्या विकूनही टाकल्या. बिजूदा आणि इंदिरा गांधी यांचंही नातं फार स्नेहाचं होतं. इतकं की ते इंदिराजींना ‘इंदू’ अशी हाक मारत असत. १९६९ च्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध उमेदवार उतरवल्यानंतर त्यांचं इंदिराजींशी असलेलं सख्य संपुष्टात आलं. आणीबाणीत बिजूदा यांना तुरुंगातही डांबण्यात आलं. अत्यंत हरहुन्नरी, कलंदर बिजूदा आणीबाणीतल्या तुरुंगवासात मात्र पार कोलमडून गेले. अतिशय निर्मळ, धाडसी बिजूदांना स्वातंत्र्यानंतर आपल्याच सरकारकडून झालेला तुरुंगवास क्‍लेशदायक होता. त्यांची तुरुंगातली मनःस्थिती पाहून मी इंदिराजींना भेटलो. ‘बिजूदांचा तुमच्यावर एवढा जीव होता, त्यांची तुरुंगातून सुटका करा,’ असं मी सुचवलं. इंदिराजींनीही पुढं बिजूदांची सुटका केली.


बिजू पटनाईक

तुरुंगवासात त्यांचा जीव एवढा कोंडला गेला होता, की सुटकेनंतर कुठेतरी निवांतपणे काही दिवस घालवावेत, असं त्यांना वाटत होतं. त्यांनी दहा दिवस काश्‍मीरला जाण्याचं ठरवलं आणि मलाही आमंत्रण दिलं. ते दहा दिवस म्हणजे माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय ठेवा आहे. अनेक विषयांवर आमच्या विस्तारानं गप्पा झाल्या. त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या पुष्कळ घटना, प्रसंग मला आपलेपणानं सांगितले. माझ्यासाठी तो समृद्धीचा ठेवा होता.
इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यलढ्याला हातभार लावणारा त्यांनी सांगितलेला अनुभव तर थक्क करणारा होता. १९४७ मध्ये भारत आणि इंडोनेशिया अशा दोन्ही देशांतला साम्राज्यशाहीविरुद्धचा लढा अगदी निकराला आला होता. इंडोनेशियाचे नंतर अध्यक्ष झालेले सुकार्नो यांना त्यांचे सहकारी सुलतान शाजीर यांना नवी दिल्ली इथं होणाऱ्या एका परिषदेत सहभागी होण्यासाठी पाठवण्याची इच्छा होती; पण इंडोनेशिया डचांच्या ताब्यात असल्यानं शाजीर यांना इंडोनेशियातून बाहेर काढणं अशक्‍य कोटीतलं काम होतं. बिजूदांच्यामधल्या धाडसावर आणि कौशल्यावर पूर्ण विश्‍वास असल्यानं शाजीर यांना इंडोनेशियातून सुरक्षितपणे बाहेर काढण्याची जबाबदारी नेहरूंनी बिजूदांवर सोपवली. बिजूदा कुशल वैमानिक होते. ते आपलं डाकोटा विमान घेऊन इंडोनेशियातल्या जावा इथं पोचले. त्यांनी अलगदपणे शाजीर यांना विमानात बसवून सिंगापूरमार्गे नवी दिल्लीत पोचवलं. इंडोनेशियानं या अचाट धाडसाबद्दल बिजूदांना मानद नागरिकत्व बहाल केलं; तसंच सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा गौरव केला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच काश्‍मीरमध्ये धुमश्‍चक्री सुरू झाली होती. पाकिस्तानी सैन्यानं काश्‍मीरमध्ये थैमान मांडलं होतं. भारतीय जवानांना काश्‍मीरमध्ये सुरक्षितपणे उतरवण्याची कामगिरी नेहरूंनी बिजूदांवर सोपवली. रडारच्या परिघात न दिसता विमान चालवण्याचा धाडसी प्रयोग बिजूदांना करायचा होता. बिजूदांनी रडार चुकवण्यासाठी धोका पत्करून विमान कमी उंचीवरून चालवत कामगिरी फत्ते केली. ही दोन्ही उदाहरणे विस्मयचकित करणारी होती.

अत्यंत परखड बोलण्याचा त्यांचा स्थायीभाव होता आणि कुणाचाही मुलाहिजा न बाळगता ते आपलं मत मांडत असत. १९७८ मध्ये ते ओडिशाचे मुख्यमंत्री होते. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो होतो; तेव्हा झालेल्या मुख्यमंत्री परिषदेत त्यांचा हा गुण मी प्रत्यक्ष अनुभवला आहे. अत्यंत कठोर प्रतिमेचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या उपस्थितीतही बिजूदा त्यांचं स्पष्ट मत मांडायला कचरले नाहीत.

फायरब्रॅंड जॉर्ज फर्नांडिस
१९६९ च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईचे अनभिषिक्त सम्राट मानले जाणारे स. का. पाटील यांना गारद करून जॉर्ज फर्नांडिस ‘जायंट किलर’ ठरले होते. मुंबईतली टॅक्‍सी युनियन आणि कामगार संघटनांमध्ये त्यांचा एवढा दबदबा होता, की धावणारी मुंबई त्यांच्या इशाऱ्यासरशी थंडावत असे. जॉर्ज यांची त्या काळातली भाषणं आणि देहबोली पाहून मला त्यांचं व्यक्तिमत्त्व आक्रमक आणि आक्रस्ताळं वाटत असे. १९७४ मध्ये तर देशव्यापी रेल्वेसंप घडवून आणल्यानंतर जॉर्ज फर्नांडिस यांचं गारुड देशभर पसरलं. जॉर्ज यांच्याबद्दल आपला गैरसमजच होता, हे त्यांच्याशी जसजसा माझा संवाद सुरू झाला तसतसं उलगडत गेलं. आवेशपूर्ण आणि अत्यंत आक्रमक भाषण करणाऱ्या जॉर्ज यांचं वाचन चौफेर होतं. अनेक विषयांचा त्यांचा व्यासंग होता आणि सर्वसामान्यांविषयी त्यांना विलक्षण कळवळा होता, कष्ट करण्याची त्यांची क्षमता अफाट होती. जॉर्ज यांच्या खोलीवर कधीही जा, ते कायम पुस्तकांच्या गराड्यातच असायचे. खोलीभर पसरलेल्या पुस्तकांच्या पसाऱ्यातून कोणत्या पुस्तकातल्या कोणत्या पानावर नेमका काय संदर्भ आहे, हे त्यांना माहीत असायचं. पुस्तकातल्या ज्ञानाचा जगात वावरताना कसा वापर करायचा याचंही त्यांचं कौशल्य वादातीत होतं.

शरद पवार यांच्याशी संवाद साधताना जॉर्ज फर्नांडिस.
(संग्रहित छायाचित्र)

जॉर्ज यांचा आणि माझा पक्ष वेगवेगळ्या विचारसरणीचा; परंतु जॉर्ज म्हणजे मी पाहिलेल्या सर्वोत्तम संसदपटूंपैकी एक आहेत. सर्वसाधारणतः ‘फायरब्रॅंड’ नेतृत्व एखादी वैधानिक जबाबदारी पार पाडताना अपयशी ठरलेलं दिसतं; पण रेल्वे आणि संरक्षण या दोन मंत्रालयांची धुरा त्यांनी ताकदीनं सांभाळली. कोकण रेल्वेच्या श्रेयाचे अनेक दावेदार आहेत; पण जॉर्ज यांचं योगदान अधोरेखित करायला पाहिजे. कोकण रेल्वेची शक्‍यता तपासण्यासाठी नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात एक बैठक आयोजिण्यात आली होती. त्या वेळी मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. रेल्वेमंत्री या नात्यानं जॉर्ज यांनाही या बैठकीला आमंत्रण होतं. ‘कोकण रेल्वेची गरज असली, तरी त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याच्या अवस्थेत केंद्र सरकार नाही,’ हे जॉर्ज यांनी प्रांजळपणे मान्य केलं. यावर ‘आम्ही काही भार उचलू’ असं मी स्पष्ट केलं. त्यावर जॉर्ज यांनी, ‘आम्ही म्हणजे कोण?’ असा सवाल केला. त्यावर ‘कोकण रेल्वेचा लाभ होणारी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ ही राज्यं’ असं मी उत्तरलो. यावर जॉर्ज यांचा प्रतिसाद सकारात्मक होता. ‘प्रत्यक्षात कितपत शक्‍य होईल, याचा विचार करा आणि मग पुन्हा बैठक घेऊ’ अशी उमेद वाढवणारी भूमिका त्यांनी घेतली.

यानंतर कर्नाटक, गोवा आणि केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री अनुक्रमे वीरेंद्र पाटील, प्रतापसिंह राणे, ई. के. नयनार यांची एक बैठक आम्ही बोलावली. गोवा आणि कर्नाटकनं त्यांचा वाटा उचलण्याची तयारी दाखवली. केरळनं मात्र निधी उभारण्यास असमर्थता दर्शवली. यावर ‘केरळच्या निधीचा वाटा महाराष्ट्र कर्जाऊ स्वरूपात उचलेल’, अशी तयारी आम्ही दाखवली. यानंतर केंद्रानं निधी उपलब्ध करून दिला. ‘कोकण रेल्वे महामंडळा’नं उभारलेल्या रोख्यांमधून रक्कम उभी राहिली. अनेक राज्य सरकारांचा सहभाग असलेला कोकण रेल्वे हा देशातला पहिला आणि एकमेव प्रकल्प आहे. या सबंध घडामोडीत जॉर्ज यांची भूमिका अत्यंत साह्यभूत होती, हे मुद्दाम नमूद करायला हवं.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये सहभागी होण्याचा जॉर्ज यांचा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक होता; परंतु काळाची पावलं ओळखून आर्थिक धोरणं स्वीकारली पाहिजेत, याचं त्यांना उत्तम भान होतं. भारतीय जनता पक्षाची मातृसंघटना ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ आहे आणि या विचारसरणीला आयुष्यभर प्राणपणानं विरोध केल्यानंतर त्यांच्या मांडीला मांडी लावून जॉर्ज कसे बसणार, याचं अनेकांना कुतूहल होतं. मी जॉर्ज यांना एकदा याबद्दल विचारलं होतं, तेव्हा त्यांनी, ‘संघातले कट्टरतावादी फारतर जोरजोरानं गर्जना करतील; पण त्यांना काहीही अनुचित कृती करता येणार नाही!’ असे आत्मविश्‍वासपूर्ण उद्गार काढले होते.
 
Top