महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या माणसाला शरद पवार हे नाव माहित असतं. लाखाच्या सभा भरल्या नसल्या ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. त्यांच्या पुढच्या कृतीचा अंदाज लावता लावता लोकं डोक्याचा भुगा करतात. आणि जीव ओवाळून टाकायचं म्हणाल, तर कायम स्वरूपी त्यांना निष्ठा बहाल करणारे निष्ठावंत कार्यकर्ते अवघ्या महाराष्ट्रभर त्यांनी निर्माण केले आहे. खेडेगावातल्या एखाद्या कार्यकर्त्यापासून साहित्य, संस्कृती क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत आणि स्वपक्षापासून विरोधी पक्षांपर्यंत पवारांच्या मैत्रीचं वर्तुळ विस्तारलेलं असतं. एखाद्या माणसाचे पैलू एवढे असू शकतात?
पवारांची स्मरणशक्ती हा अफलातून गुण आहे. आयु्ष्यात त्यांना एकदा भेटलेली माणसे पुढे दहा वर्षांनी भेटली तरी त्यांच्या लक्षात रहातात. आणि असं घडलेलंही आहे. खेड्या पाड्यात सभेला गेल्यानंतर ते तेथील नेत्यांना, जुन्या जाणत्यांना अगदी नावानिशी हाक मारून त्यांच्याशी आदराने बोलतात. त्यांना मान देतात. समोरची व्यक्ती आपल्याला पवार ओळखतात एवढ्या आनंदातच त्यांची कधी होते, ते कळतही नाही. अगदी तालुकास्तरावरच्या नेत्यांची नावेही पवारांच्या डोक्यात असतात. एकदा तर एका सभेला समोरच्या सभाजनांमधील एका शाळूसोबतीला पवारांनी हाक मारून बोलाविल्याचा किस्सा प्रसिद्ध आहे.
माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत आहे. कठीण परिस्थितीतूनही ते मार्ग काढतात. त्यामुळे कुणीच त्यांचा दीर्घकाळ शत्रू रहात नाही. बाळासाहेब ठाकरे हे तर मोठं उदाहरण. राजकारणापलिकडे त्यांची मैत्री आहे.(आता तर ती राजकीय पातळीवरही येऊ पहात आहे.) अनेक विरोधी पक्षातील लोक त्यांचे मित्र आहे. माजी उपराष्ट्रपती भैंरोसिह शेखावत यांच्या निवडणूकीवेळी म्हणूनच पवारांबद्दल ते त्यांच्या बाजूने मतदान करतील, अशी अफवा होती. कारण शेखावतांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. पण केवळ शेखावतच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवर अनेक नेते पवारांचे चांगले मित्र आहेत. यात सत्ताधारी व विरोधकांचाही समावेश आहे.
प्रत्येक क्षेत्रातील बड्या लोकांशी त्यांचे संबंध चांगले आहेत. रतन टाटा असो वा राहूल बजाज किंवा अनिल, मुकेश अंबानी असो वा अन्य कुणी उद्योगपती त्यांना शरद पवार जवळचे वाटतात. पण हे इतर क्षेत्रांनाही लागू आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांची मैत्री प्रसिद्ध आहे. पण नाट्य क्षेत्रातील जब्बार पटेल, मोहन आगाशे, मोहन जोशी यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत.
पवारांना वाचनाची आवड आहे. त्यांच्या वैयक्तिक संग्रहात अनेकदा नवीन आलेली पुस्तकं आढळतात. मुंबईत पु. ल. देशपांडे भवन उभारण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. यशंतराव चव्हाण यांच्या स्मृत्यर्थ उभारलेल्या चव्हाण सेंटरतर्फे म्हणूनच अनेक सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रम होतात. कारण त्याची प्रेरणा शरद पवार आहेत. पवारांमुळेच साहित्य क्षेत्रातील अनेक चांगली मंडळी राजकारणात आली. ना. धो. महानोर व रामदास फुटाणे यांची उदाहरणं समोर आहेत.